तुला वजा केल्यावर...

कवितेसाठी म्हणून सहज तुला वजा करावं म्हटलं,
पण तुला वजा केल्यावर कवितेलाही अपूर्णच रहावं वाटलं...

खुप विचार केला पण काही सूचलंच नाही,
कारण तुला वजा केल्यावर माझ्यामध्ये माझे काही उरलंच नाही...

तुला वजा केल्यावर मी प्रार्थनेत काय मागावं? 

तुला वजा केल्यावर मी कुणासाठी हसावं?
तुला वजा करण्याची मी ताकत कुठून आणावी??
तुला वजा केल्यावर मी कविता कुणावर लिहावी?

तुला वजा केल्यावर माझ्या ओठांवर दुसरं नाव कोणतं असावं?
तुला वजा केल्यावर माझ्या डोळ्यांत दुसरं स्वप्न कोणतं असावं?
तुला वजा केल्यावर मी कोणाशी तासन् तास बोलावं?
तुला वजा केल्यावर सांग मी कुणासाठी जगावं?

सागरातून किनाऱ्याला वजा करावं तरी कसे?
पंखांशिवाय पाखरानं उडावं तरी कसे?
सावलीलाच स्वतःच्या कुणी वजा करतं का कधी?
फुलांशिवाय बगीचा फुलतो का कधी?

तुला वजा केल्यावर फ़क्त प्रश्नच शिल्लक राहतात...
तुझ्यासमोर निरुत्तर असतोच मी,
तुला वजा केल्यावर प्रश्नही जास्तच गहण होतात...

खूप विचार केला पण तुला वजा मी करू शकलोच नाही...
तू नसशील अशी एकही गोष्ट मी शोधू शकलोच नाही...

सारं गणित मी जोडून पाहिलंय,
स्वप्नांनाही तुझ्याशिवाय पाहून पाहिलंय,
चंद्राशिवाय रात्र राहू शकते कधीतरी,
तुझ्याशिवाय राहायला मला कधीच जमणार नाही...

सहज म्हणूनही तुला वजा करायला मला जमेना झालंय...
तू मात्र मला कायमचंच वजा केलयंस...
तुझ्या मनातून, तुझ्या आठवणींतून आणि तुझ्या विश्वातून...

- स्वप्निल संजयकुमार कोटेचा

Comments

Popular Posts