सवय

नदीकाठच्या भटकंतीत अन पहाटेच्या धुंद गारव्यात,  
टिपूस टिपूस पावसात अन मंद चंदेरी चांदण्यात,  
हातात असावा तुझा हात, असं मनापासून वाटायचं, 
पण तुझ्याशिवाय जगण्याची आता मला सवय झाली आहे...
 
तू हसलीस की जग जिंकल्यासारख वाटायचं,
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्या डोळ्यात सापडायचं,
अंधारून आलाय जग माझे तुझ्याशिवाय जगताना,
पण याच अंधारात चाचपडण्याची आता मला सवय झाली आहे...
 
हसू विरलय ओठांवरचे, बैचेन आहे प्रत्येक क्षण,
स्वप्नांच्या दुनियेत उडण्याआधीच छाटले गेलेत माझे पर,
तुझ्याशिवाय आयुष्याचा कधी विचारच केला नव्हता,
पण आनंदी जगण्याच्या या धोंगाची आता मला सवय झाली आहे...
 
स्वप्नांत जगायचो पूर्वी तुझ्या, हल्ली आठवणीत जागतोय,
कोमेजलेल्या फुलांमध्ये आशेची एक कळी शोधतोय,
बागेतल्या त्या शेवटच्या बाकावर आजही तुझी इतकी वाट पाहतोय,
की निर्जीव त्या बाकड्यालाही तुझी वाट पाहण्याची सवय झाली आहे...
 
राणीसारख ठेवलं असतं, फुलासारखं जपलं असतं,
पण साधं भोळ प्रेम माझं तुला का बर रुचलं नाही?
पायाखाली तुडवून गेलीस कोमल हृदय माझं,
तरीही तुझ्याचसाठी झुरण्याची या वेड्या मनाला सवय झाली आहे...
तुझ्याशिवाय जगण्याची आता मला सवय झाली आहे...
 
- स्वप्नील कोटेचा

Comments