तू आणि पाऊस

तुझ्यात आणि  पावसात एक अनामिक नाते आहे… 
तूही अशीच बरसतेस, न सांगता… पावसासारखी… 

तुझे हसणं, तुझे रूसणं, सारंच पावसासारखं… अगदी बिनधास्त… 
मनाच्या कानाकोपऱ्यांना चिंब भिजवणारं…  
आनंदाच्या नदीपात्राला तुडुंब भरवणारं…

तू येतेस तेव्हा आभाळालाही बरसावं वाटतं… 
जणू पावसांचही सुंदर गाणं होतं… 

तुझ्यात आणि  पावसात एक वेगळंच साधर्म्य आहे… 
तूही नितळ, स्वच्छ, मनमुराद… पावसासारखी… 

तुझे प्रेम, तुझी माया, सारंच पावसासारखं… मला तरसवणारं… 
दवाच्या टपोऱ्या मोत्यांसारखे मनावर साचणारं
ओंजळीत साठवलं तरी अलगद निसटून जाणारं

तू येतेस तेव्हा पावसाच्या सरीही रेंगाळत राहतात
मातीबरोबर माझ्या मनालाही गंधाळत राहतात

तुझ्यात आणि  पावसात एक आगळंच रहस्य आहे… 
तुझ्या डोळयांतही आहे एक गहिरेपण पावसासारखं… 

तुझे नखरे, तुझ्या अदा, साऱ्याच पावसासारख्या… नेहमीच नव्या… 
जितक्या पारदर्शक, तितक्याच रंगांनी नटलेल्या… 
थोडयाश्या तालेबद्ध, थोडयाश्या भरकटलेल्या… 

तुझ्या बरसातीत मन कसे धुंद होऊन जातं,
दाटून आलेल्या आठवणींचे ढग रिते करून जातं

तुझ्या आणि पावसासोबतच्या या खेळामध्ये मी असाच हारत राहीन
अन माझ्या अंतःकरणातला हा पाऊस असाच बरसत राहील

कधी माझ्या मनातून, कधी माझ्या कवितांतून
अन लोकांच्या नजरा चुकवून कधी माझ्या डोळयांतून


- स्वप्नील संजयकुमार कोटेचा

Comments