सावर तू स्वतःला…



अथांग पसरलंय आकाश हे, अजून खूप उडायचे आहे, 
पण पंखातलं बळ मोडण्याआधी पाखरा सावर तू स्वतःला… 

वादळात अडकलीय नौका तुझी, किनारा अजून नजरेआड आहे,
झुंझत रहा, फक्त धीर सोडण्याआधी वीरा सावर तू स्वतःला… 
 
सगळेचजण धावताहेत येथे, सर्वांनाच पुढे जायचे आहे,
पण जिथून परतीचे मार्गच बंद होतील अशा रस्त्यांमध्ये हरवण्याआधी सावर तू स्वतःला…
 
लढत झगडत आयुष्याशी यशाची शिखरे गाठशील तू कधीतरी,
पण जिथून तुला आपली माणसंच दिसणार नाहीत अशा उंचीवर पोहचण्याआधी बाळा सावर तू स्वतःला… 

जीवनाच्या या खेळामध्ये जिंकशील तू क्षणोक्षणी,
पण तुझा आनंद साजरा करणारे सोबत नसण्याआधी वेडया सावर तू स्वतःला… 

असत्याशी झुंझावंच लागेल तुला, सारी दुनिया मुखवट्याआड दडली आहे,
तुझ्याही चेहऱ्यावर मुखवटा चढण्याआधी नायका सावर तू स्वतःला…

स्त्रीच्यापोटी जन्मलास तू, तीच तुझी अर्धांगिनी आहे,
तिच्यावर अत्याचार करण्याआधी नराधमा सावर तू स्वतःला…

करपलंय रान तुझं, शिवारही पेटले आहे, समोर कर्जाचा डोंगर अन झोपडीत उपाशी पोर आहे,
तरीही फासावर लाट लटकण्याआधी बळीराजा सावर तू स्वतःला…

सर्वांसारखंच मातीत तुलाही मिसळायचंय आहे कधीतरी, 
पण तुझी माणुसकी मातीत मिसळण्याआधी माणसा सावर तू स्वतःला… 

- स्वप्नील संजयकुमार कोटेचा

Comments