खूप काही कमी आहे...


खूप काही मिळवूनही खूप काही कमी आहे,
जवळच असूनही सगळे, बरंच काही दूर आहे...

प्रत्येक घासामध्ये आईच्या मायेची ऊब कमी आहे,
प्रत्येकक्षणी सोबत असणाऱ्या भावाची साथ कमी आहे,
लोकांची गर्दीतर आहे पण आपल्याशा मित्रांची कमी आहे,
दादा, दादी अन दादु अशी बहिणींची लाडकी हाक कमी आहे...

धडपडताना वाटेवरती बापाचा आधार दूर आहे...
दिव्यांच्या झगमगाट दिसतोय पण प्रकाश खूप दूर आहे...
स्वताला विसरावं जिच्यासाठी त्या 'ती' पासून दूर आहे,
एकटा असूनही माझ्यातल्या 'मी' पासून दूर आहे...

खूप काही मिळवूनही खूप काही कमी आहे,
जवळच असूनही सगळे, बरंच काही दूर आहे...

जीवनाचं गणितही किती अवघड असतं...
नेमकं तेच वजा होते जे मिळवायचं असतं...
स्वप्नं पण ही किती बेरकी असतात,
पाहताना फुकट अन जगताना खूप किंमत मोजायला लावतात...
आकाश पण हे किती फसवे असते,
कधी सामावाते मुठीत तर कधी अथांग पसरते...
वाटायचं चंद्र आहे माझ्यासारखाच एकटा,
असेल नेहमी सोबत पण तोही अधुनमधून होतो कुठेतरी गायब...
एरव्ही कुजबुजणारा वाराही हल्ली शांत झालाय,
समुद्रही लाटांची चादर ओढून केव्हाच झोपी गेलाय...

स्वतःच्याच जाळ्यात कोळ्यासारखं गुरफटलोय मी...
एकटाच चालत चालत किती दूर आलोय मी...
खूप काही मिळवूनही खूप काही कमी आहे,
जवळच असूनही सगळे, बरंच काही दूर आहे...
सोबत आहेत आता फ़क्त शब्द आणि आठवणी...
त्यांच्याशीच हसतखेळत स्वतःला सावरतोय मी...

- स्वप्नील संजयकुमार कोटेचा

Comments

Popular Posts